दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय 03 SEP 2024 :स्पॅम कॉलच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ला आढळले आहे. वर्ष 2024 च्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी ते जून) बिगर नोंदणीकृत टेलिमार्केटियर्स (UTM) विरुद्ध 7.9 लाखांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
या समस्येला गांभीर्याने घेत ट्राय ने 13 ऑगस्ट 2024 रोजी सर्व सेवा प्रदात्यांसाठी कठोर निर्देश जारी केले होते. एसआयपी, पीआरआय किंवा इतर दूरसंचार संसाधनांचा वापर करून बिगर नोंदणीकृत प्रेषक किंवा टेलीमार्केटरकडून प्रमोशनल व्हॉईस कॉल तात्काळ थांबवावेत असे आदेश सेवा प्रदात्यांना ट्राय ने दिले आहेत. या संसाधनांचा गैरवापर करताना आढळलेल्या कोणत्याही बिगर नोंदणीकृत टेलिमार्केटियर्स (UTM) ला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. यामध्ये दोन वर्षांपर्यंत सर्व दूरसंचार संसाधने खंडित करणे आणि काळ्या यादीत टाकणे समाविष्ट आहे.
या निर्देशांच्या परिणामी, सेवा प्रदात्यांनी स्पॅमिंगसाठी दूरसंचार संसाधनांच्या दुरुपयोगाविरूद्ध कठोर पावले उचलली आहेत आणि 50 हून अधिक संस्थांना काळ्या यादीत टाकले आहे तर 2.75 लाखांहून अधिक एसआयपी डीआयडी /मोबाइल नंबर /टेलिकॉम संसाधनांची जोडणी खंडित केली आहे. या पावलांचा स्पॅम कॉल्स कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण परिणाम होईल अशी अपेक्षा आहे. सर्व भागधारकांनी निर्देशांचे पालन करावे तसेच स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम टेलिकॉम परिसंस्थेत योगदान द्यावे असे आवाहन भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने केले आहे.
Комментарии