नवी दिल्ली, 3 सप्टेंबर 2024: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ने देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर विनाअडथळा अखंड वाहतूक सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने 100 टोल नाक्यांवर भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आधारित सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देखरेख सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रणालीद्वारे टोल प्लाझांवरील वाहनांची रांग, प्रतीक्षा कालावधी, आणि वाहनांची गती याची वास्तविक वेळेतील माहिती संकलित केली जाईल. राष्ट्रीय महामार्ग हेल्पलाइन 1033 द्वारे मिळालेल्या अभिप्रायांच्या आधारे हे टोल नाके निश्चित करण्यात आले आहेत.
याद्वारे टोल प्लाझांवर वाहनांची रांग निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास, प्रत्यक्ष देखरेख आणि मागोवा प्रणालीद्वारे वाहतूककोंडी संदर्भात संदेश आणि मार्गिकेबाबत सूचना मिळतील. सॉफ्टवेअर वाहनांच्या रांगा आणि वाहतूक स्थितीच्या तुलनात्मक विश्लेषणासोबतच सध्याच्या हवामान परिस्थितीची ताजी माहिती आणि स्थानिक सणांविषयी माहिती देखील प्रदान करेल.
एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक आधारावर वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यास मदत मिळेल. या प्रणालीमुळे राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्यांना कोंडीविरहित रहदारी आणि त्रासमुक्त पथकर अनुभवता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या GIS आधारित देखरेख प्रणालीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने अन्य टोल नाक्यांवरही केली जाणार आहे, ज्यामुळे देशभरातील वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा होईल.
Comments