नवी दिल्ली, 4 सप्टेंबर :भारतीय मद्य उत्पादनांना जगात वाढती मागणी असून, यामधून या क्षेत्रात विकासाची संधी असल्याचे स्पष्ट होत आहे. अपेडा (APEDA), अर्थात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न निर्यात विकास प्राधिकरणाने पुढील काही वर्षांमध्ये 1 अब्ज डॉलर्स निर्यात महसुलाचे उद्दिष्ट ठेवून, जागतिक स्तरावर भारतीय अल्कोहोलिक (मद्य) आणि नॉन-अल्कोहोलिक (मद्य विरहित) पेयांना प्रोत्साहन देण्याची योजना आखली आहे.
‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून अपेडा ने परदेशातील प्रमुख देशांमध्ये भारतीय मद्य उत्पादनांची निर्यात वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मद्य (अल्कोहोलिक) निर्यातीत भारत सध्या जगात 40 व्या क्रमांकावर आहे.
भारतात राजस्थानमध्ये बनवण्यात आलेली गोदावन सिंगल माल्ट व्हिस्की, युनायटेड किंगडममध्ये आर्टिझन सिंगल माल्ट व्हिस्की म्हणून, प्रवेश करण्यासाठी सज्ज असून, भारतीय मद्य निर्यातीमधील हा महत्वाचा टप्पा ठरेल.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल आणि डायजिओ पीएलसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डेब्रा क्रू, अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, डियाजिओ इंडिया च्या एमडी आणि सीईओ हिना नागराजन, आणि इतर वरिष्ठ प्रतिनिधींच्या उपस्थितीत, गोदावनच्या पहिल्या तुकडीला युनायटेड किंग्डममधील निर्यातीसाठी हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
गोदावन सिंगल माल्ट व्हिस्कीने मार्च 2024 मध्ये लंडनमधील इंटरनॅशनल फूड अँड ड्रिंक्स इव्हेंट (IFE) मध्ये अपेडा अंतर्गत सहभाग नोंदवला होता, आणि गोदावनची जाहिरात केली होती. गोदावनचा यूकेमधील प्रवेश आणि यूकेला निर्यात होण्यामध्ये या सहभागाने मोलाची भूमिका बजावली.
अलवर भागातील शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळेल. गोदावनच्या उत्पादनासाठी वापरलेली ‘सिक्स-रो’ प्रकारची बार्ली, स्थानिक पातळीवर खरेदी करण्यात आली असून, उद्योगांना पुरवठा साखळीशी जोडल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होत आहे.
Comments