मुंबई 9 सप्टेंबर : केंद्रीय अन्वेषण विभागाने (The Central Bureau of Investigation - CBI) मुंबई पश्चिम आयुक्तालयातील केंद्रीय वस्तू व सेवा कर (करचुकवेगिरी विरोधी) अधीक्षक आणि इतर दोन व्यक्ती मिळून, तीन जणांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आणि अटक केली. या प्रकरणात मिळालेल्या तक्रारीनंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून केलेल्या कारवाई केली. यात अटक केलेल्या व्यक्ती, त्यांनी मागणी केलेल्या एकूण 60 लाख रुपयांच्या लाचेपैकी 20 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्या गेल्या. याशिवाय या व्यक्तींनी हवालाच्या माध्यमातून अतिरिक्त 30 लाख रुपये स्विकारले असल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.
केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयाचे सहा अधिकारी, एक सनदी लेखापाल आणि इतर व्यक्ती मिळून लाचेची मागणी करत असल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. त्या तक्रारीनंतर सीबीआयने ही कारवाई केली. या तक्रारीनुसार मुंबईतील सांताक्रूझ इथल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला 4 सप्टेंबर 2024 च्या संध्याकाळी बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले, आणि 5 सप्टेंबर 2024 पर्यंत थांबवून ठेवले. याच काळात या आरोपींमधील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक असलेल्या व्यक्तीने तक्रारदाराला अटक करण्याची भिती घालत ती टाळण्यासाठी आधी 80 लाख रुपयांच्या लाचेची आणि त्यानंतर ती कमी करून 60 ८० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
त्यानंतर केंद्रीय वस्तू आणि सेवा कार्यालयातील इतर तीन अधीक्षकांनी तक्रारदारावर लाच देण्यासाठी प्रचंड दबाव आणला, त्यांनी तक्रारदारा विरोधात बळाचा वापर केला, आणि लाच देण्यास भाग पाडले, असे तक्रारदाराने म्हटले आहे. या अधिकाऱ्यांच्या ताब्यात असतानाच तक्रारदाराच्या चुलत भावाशी संपर्क साधून त्याच्याशीही लाचेची मागणी पूर्ण करण्याबाबत बोलले गेल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे. त्यानंतर या तक्रारदाराच्या चुलत भावाने आरोपींपैकी सनदी लेखापाल असेलेल्या व्यक्तीसह, त्यांच्या इतर साथीदार व्यक्तींशी संपर्क साधला आणि लाचेच्या रकमेबाबत वाटाघाटी केल्या, यानंतर त्यांच्यात 60 लाख रुपयांवर सहमती झाली. या 60 लाख रुपयांपैकी 30 लाख रुपये तक्रारदाराची सुटका करण्याआधीच हवालाच्या माध्यमातून दिले गेल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.
या संदर्भातली तक्रार प्राप्त झाल्यावर सीबीआयने सापळा रचला, आणि आरोपी असलेल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने 20 लाख रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी सनदी लेखापाल व्यक्तीला रंगेहाथ पकडले. या कारवाई अंतर्गत स्विकारलेली लाच दुसऱ्या एका साथीदार व्यक्तीपर्यंत पोहचवण्याच्या प्रक्रियेचाही समावेश होता, हीच व्यक्ती, त्याला लाच म्हणून मिळालेली रक्कम केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना सोपणार होती. त्यानुसार आरोपींपैकी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिक्षक असलेली व्यक्ती त्याला पैसे देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला मुंबईत ओशिवारा इथे भेटून लाचेची रक्कम स्विकारताना सीबीआयने रचलेल्या सापळ्यात अडकली आणि त्यालाही अटक करण्यात आली.
या कारवाईनंतर सीबीआयने अटक केलेल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिक्षक, सनदी लेखापाल आणि त्यांच्या साथीदार व्यक्तीला मुंबईतल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिक्षक आणि सनदी लेखापालाला 10 सप्टेंबर 2024 पर्यंत सीबीआय कोठडी तर, त्यांच्या साथीदाराला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाई सोबतच सीबीआयने संबंधित आरोपींच्या कामाची ठिकाणे तसेच निवासाच्या ठिकाणांसह एकूण नऊ ठिकाणी छापे टाकले आणि काही संशयास्पद दस्तऐवजही जप्त केले आहेत.
या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे.
留言